शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकार ‘हा’ मोठा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका आताच पार पडल्या असून त्याचा निकाल लागायला २ दिवसांचा कालावधी शिल्लक असताना राज्य असरकारने मात्र विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु केल्याचे दिसून येत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु आहे. मार्च २०१६-१७ ते २०१८ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन मोठा दिलासा देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री राज्यभरात विकास यात्रा काढणार आहे. मुख्यमंत्री जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तीन ते चार टप्प्यात यात्रा काढून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत.

राज्यात भयानक दुष्काळ

पाऊस कमी पडल्याने या वर्षी महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ पडला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांना देखील पाणी उपलब्ध होत नाही. चारा छावण्यांमध्ये देखील चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध नाही. त्याच पार्शवभूमीवर कदाचित शासन हा निर्णय घेणार असल्याचे समजत आहे. सरकारने यावर उपाययोजना केल्या, मात्र त्या पुरेशा नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहे. हा आकडा चिंताजनक आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे समजत आहे.

दरम्यान, याआधी देखील राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले होते. मात्र या दुष्काळाच्या दाहकतेने भाजलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिलासा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात दौरा करून परिस्थितीचा देखील आढावा घेणार आहेत.

You might also like