कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत जरी उभं केलं तरी ती निवडून येणार नाही : आमदार बच्चू कडू

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – कंगना राणौत सध्या तिच्या वादग्रस्त विधानामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कंगनामुळे राज्यातील सरकार अस्थिर होण्याचं कारण नाही. मीडियानं देखील तिला महत्त्व देण्याची गरज नाही. कंगनाला ग्रामपंचायत निवडणुकीत जरी उभं केलं तरी ती निवडून येणार नाही. एवढंच नाही तर तिचं डिपॉझिट देखील जप्त होईल, अशा शब्दांत राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी कंगनाची खिल्ली उडवली आहे.

यावेळी आमदार बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, एखाद्या अभिनेत्रिला हाताशी धरून भाजप राजकारण करत आहे. हे घाणेरडे राजकारण करणे चुकीचे आहे. कंगना राणौतला आम्ही कवडीची देखील किंमत देत नाही, असे म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच एखाद्या अभिनेत्रीने उलट सुलट आरोप केल्यानंतर राज्यातील सरकार कोसळण्याचा प्रश्नच येत नाही. कारण शिवसेनेचा वाघ तिथं बसला असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, सिनेसृष्टीचे ‘गटार’ झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या ‘झांजा’ असल्याने या मंडळींनाही ‘चिपळ्या’ वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेईमानी ठरली तरी चालेल. ‘सब घोडे बारा टके’ असं सरसकट म्हणणे हा सच्चा कलाकारांचा अपमान ठरतो. जया बच्चन यांनी तोच आवाज उठवून सिनेसृष्टीला जाग आणली, असे म्हणत शिवसेनेनं जया बच्चन यांची पाठराखण करत कंगनावर पुन्हा एकदा पलटवार केला आहे. सामनाच्या अग्रलेखातून जया बच्चन यांची शिवसेनेने पाठराखण केली आहे.