Corona Vaccine : भारत बायोटेकची ‘कोव्हक्सिन’ हैदराबादहून दिल्लीत

हैदराबाद : सीरम इन्स्टिट्युटच्या ‘कोविशिल्ड’ कोरोना लसीचे देशभरात वितरण मंगळवारी सुरु झाल्यानंतर त्या पाठोपाठ भारत बायोटेकची ‘कोव्हक्सिन’च्या वितरणास सुरुवात झाली आहे. हैदराबाद येथील राजीव गांधी विमानतळावरुन एअर इंडियाच्या विमानाने ‘कोव्हक्सिन’ची लसीची पहिली खेप दिल्लीला आज सकाळी रवाना झाली.

भारत बायोटेकने इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या मदतीने ‘कोव्हक्सिन’लस विकसित केली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल यांच्याकडून सीरम इन्स्टिट्युट च्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हक्सिन’ या दोन्ही लसींना एकाच वेळी आपत्तकालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

सीरम इन्स्टिट्युटने काल देशभरातील १३ शहरात ५६ लाख डोस वितरीत केले होते. त्यापाठोपाठ आता भारत बायोटेकची ‘कोव्हक्सिन’ च्या देशभरात वितरणास सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशभरातील विमानतळावर कोरोना लसीच्या वितरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
येत्या १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाºयांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास देशभरात एकाचवेळी सुरुवात होणार आहे.

मुंबईत सीरमची लस पोहचली
सीरम इन्स्टिट्युटमधून आज पहाटे मुंंबईसाठी कोविशिल्ड लस रवाना करण्यात आली. पोलीस बंदोबस्तात एका विशेष वाहनातून हे लसीचे डोस मुंबईला रवाना झाले. १ लाख ३९ हजार ५०० डोस मुंबईत पोहचले असून ते महापालिकेच्या एफ वॉर्डात ठेवण्यात आले आहेत.