Coronavirus : जयंत पाटील यांच्या ‘त्या’ फोनमुळे घाबरलेल्या पर्यटकांना मिळाली ‘उमेद’, म्हणाले – ‘साहेबांच्या कानावर घालतो’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. त्यामुळे देशविदेशातून नागरिक आपआपल्या घरी पोहचण्यासाठी धडपड करीत आहेत. कोरानामुळे पर्यटनासाठी उज़्बेकिस्तानच्या ताशकंद येथे गेलेले महाराष्ट्रातील जवळपास 39 नागरिक अडकून पडले आहेत. संबंधित पर्यटकांनी थेट राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी ’तुम्ही घाबरू नका, मी पवार साहेबांच्या कानावर घालतो, असं आश्वासन जयंत पाटील यांनी दिल्याने पर्यटकांना धीर आला. त्यामुळे आता अडकलेल्या पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. सर्वाधिक कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यातच विमानसेवा नसल्याने 39 नागरिक उज़्बेकिस्तानच्या ताशकंद येथे अडकले आहेत. 10 मार्चला हे पर्यटक भारतातून गेले होते तर काल (16 मार्च) हे पर्यटक मायदेशी परतणार होते. मात्र, ऐनवेळी त्यांना विमानसेवा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. घाबरलेल्या या पर्यटकांनी मंत्री जयंत पाटील यांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली. तुम्हाला मायदेशी परत आणण्यासाठी सर्वच प्रयत्न केले जातील. तसेच शरद पवार यांना तुम्हाला परत आणण्यासाठी केंद्राकडे शब्द टाकण्यासाठी विनंती करेल, असे आश्वासन मंत्री जयंत पाटील यांनी त्या पर्यटकांना दिले आहे.