मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष मिळून राज्यात सत्ता स्थापन करणार आहेत. त्यामुळं उद्या महाशिव आघाडीची नेता निवडीसाठी बैठक होणार असून उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री पदी सर्व सहमतीनं निवड करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, उप मुख्यमंत्री पदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेमकं कोण विराजमान होणार हे काही तासात स्पष्ट होणार आहे.

नवीन सरकारमध्ये 2 उप मुख्यमंत्री असतील असं देखील सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री पदासाठी उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांची नावे चर्चेत होती. मात्र, आता सरकार हे एकटया शिवसेनेचं नसुन सरकार हे महाशिव आघाडीचं असणार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेता निवडीसाठी उद्या बैठक घेणार आहे. त्यामध्ये उध्दव ठाकरे यांचं नाव सर्व सहमतीनं ठरवलं जाईल असं सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, काँग्रेसनं दिलेला पाठिंबा हा बाहेरून असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

काँग्रेसकडून अद्यापही शिवसेनेला दिलेला पाठिंबा हा बाहेरून आहे की सत्तेत सामील होऊन देणार हे सांगण्यात आलेलं नाही. उध्दव ठाकरे हे मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यास मान्य होतील का नाही याबाबत देखील शंका आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा चालु आहे.

Visit : Policenama.com