आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे ‘वेळापत्रक’ जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. उन्हाळी सत्राच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा 15 जुलैपासून सुरु होणार आहेत. विद्यापीठाने वेळापत्रक आपल्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. ज्या महाविद्यालयात प्रवेश आहे तेथेच या परिक्षा होणार आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होऊ नये यासाठी विद्यापीठाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यापीठ परीक्षा संबंधी अधिक माहिती शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यांगत यांनी विद्यापीठाचे संकेतस्थळ www.muhs.ac.in वरील माहिती अधिकृत समजण्यात यावी असे आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे वैद्यकीय परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन चर्चा केली. वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत्या 15 जुलै पासून घेण्याची विद्यापीठाची तयारी आहे. तसा प्रस्ताव विद्यापीठाने दिला आहे. याबाबत राज्यपालांना माहिती दिल्याचे, अमित देशमुख यांनी सांगितले.