मुंबईराजकीय

‘…नाहीतर आमच्यावर पावती फाडाल’, अजित पवारांचा नाव न घेता राज ठाकरेंवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने सगळ्यांसाठी तो चिंतेचा विषय ठरला आहे. दरम्यान, याविषयी राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात देखील उल्लेख केला होता. त्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय टोलेबाजी केली. यावेळी त्यांनी नाव न घेता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

अजित पवारांचा दरेकरांना चिमटा
विधान परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, मंत्रिमंडळातील 7 ते 8 सदस्यांना कोरोना झाला आहे. काही आमदारांनाही कोरोना झालाय. फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोरोना झाला नाही. दरेकरांच्या जाकिटमुळेच त्यांना कोरोना झाला नसेल असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. तुमची रोग प्रतिकारशक्ती जास्त असेल किंवा तुमचं जॅकेट पाहून कुठं आत शिरायचं म्हणून कोरोना झाला नसावा काय असेल माहित नाही. कोरोना होऊ नये अशी इच्छा आहे. यामुळे उद्या समजा कोरोना झाला तर कशाला दृष्ट लावली म्हणून आमच्यावर पावती फाडाल असा चिमटा त्यांनी काढला.

राज ठाकरेंना टोला
राज्यात कोरोनाचं संकट अद्याप टळलं नाही, अलीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्यातील पुणे, अमरावती, अकोला अशा अनेक शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासकीय पातळीवर बैठका सुरु आहेत, सगळ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. मास्क लावणे, सुरक्षित अंतर पाळणं याचे नियम पाळलेच पाहिजे. काही नेते म्हणतात मी मास्क वापरत नाही, पण दुसऱ्यांना त्रास झाला तर त्याचं काय… एकेकाळी प्रविण दरेकरांचे ते नेते होते, असं म्हणत त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना टोला लगावला.

अजित पवारांचा सूचक इशारा
आम्हाला कोरोना झाला, तुम्हाला होऊन नये अशा शुभेच्छा. नाहीतर उद्या कोरोना झाला तर म्हणतील यांची दृष्ट लागली, असं म्हणून माझ्यावर पावती फाडू नका, असे अजित पवार म्हणाले. तेवढ्यात मागून एका सदस्याने, प्रसाद लाड यांनी ज्यांना ज्यांना जॅकेट दिलं, त्यांना कोरोना झाला, असे म्हणताच अजित पवार म्हणाले, प्रसादने (भाजप आमदार) मलाही जॅकेट दिलं होतं, असं म्हणत सूचक इशारा केला आणि सभागृहात पुन्हा हशा पिकला.

Back to top button