तावडेंची ‘विनोदी’ फटाकेबाजी, म्हणाले – ‘अजित पवार म्हणजे सुतळी ‘बॉम्ब’ची क्षमता असणारा ‘डांबरी’ फटाका तर शरद पवार म्हणजे…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशभरात सर्वत्र दिवाळीचा उत्साह आहे. त्यातच महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये विधानसभा निवडणूका पार पडल्या. त्यामुळे दोन्ही राज्यातील पराभूत उमेदवारांची दिवाळी कडू झाली तर विजयी झेंडा फडकावणार्‍यांची दिवाळी गोड झाली आहे. दरम्यान, राजकिय क्षेत्रात सक्रिय असणार्‍या अनेक नेत्यांनी विविध कारणामुळं यंदाची निवडणुक लढवली नाही. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना माजी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडेंनी राज्यातील नेत्यांना विविध फटाक्यांची उपमा दिली आहे.

यंदाची निवडणुक न लढवल्यामुळं विनोद तावडे शासकीय निवासस्थान सोडून स्वतःच्या घरी परतले आहेत. त्यामुळं यंदा त्यांच्या कुटूंबियांकडून दिवाळी त्यांच्याच घरी साजरी होत आहे. राजकीय नेत्यांना फटाक्यांची उपमा देताना विनोद तावडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे सुतळी बॉम्बची क्षमता असणारा डांबरी फटाका असं म्हंटलं आहे. भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसेंना कधीच न विझणार्‍या आणि उर्जा कधीही कमी न होणार्‍या फटाक्याची उपमा दिली आहे. चंद्रकांत पाटलांना सर्वांना सामावून घेणारा पाऊस तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांना पक्षाला उंचीवर नेणारं रॅकेटची उपमा देण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार म्हणजे अ‍ॅटम बॉम्ब आहेत. मात्र, हा अ‍ॅटम बॉम्ब कधी वाजतो तर कधी वाजत नाही असं तावडेंनी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तावडेंनी इको फ्रेंडली फटाक्याची उपमा दिली असून त्यांचं कौतुक केलं आहे.