भास्कर जाधव संतप्त; म्हणाले – ‘विरोधकांचे बिंग फुटेल याची फडणवीसांना वाटतेय भीती’

मुंबई : मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांकडून उद्धव ठाकरे यांच्या सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, 2018 मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले.

भास्कर जाधव यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, 2018 मध्ये अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबून टाकले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सासू आणि नवऱ्याच्या मृत्यूची चौकशी करावी असे लिहिले. पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण दाबले. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी सचिन वाझे करत आहेत. त्यांच्यावर आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी केली जात आहे. मात्र, सरकार सचिन वाझेंना काढणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला.

दरम्यान, सचिन वाझे तपास अधिकारी राहिले तर विरोधकांचे बिंग फुटेल, याची भीती देवेंद्र फडणवीस यांना आहे. तसेच जस्टिस लोया यांची नागपुरात हत्या कशी झाली? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असेही भास्कर जाधव म्हणाले.