उस्मानाबाद, भूम-परंडा, तुळजापूर आणि उमरग्यात कोण बाजी मारणार ! आघाडीसमोर युतीचं जबरदस्त ‘आव्हान’

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन – राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरु असून जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खरी रंगत निर्माण झाली असून  अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. आज आपण यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याच्या राजकारणाची  माहिती घेणार असून निवडणुकांचा आढावा  देखील घेणार आहोत.

उस्मानाबाद जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघ असून यामध्ये काँग्रेसचे आमदार मधुकर चव्हाण, भाजपमध्ये प्रवेश केलेले राणाजगजितसिंह पाटील, सेनेचे ज्ञानराज चौगुले आणि राष्ट्रवादीचे राहुल मोटे  विधानमंडळात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे या निवडणुकीत चारपैकी विद्यमान दोन आमदारांना घरीच बसावे लागणार असल्याची परिस्थिती आहे. या चार विधानसभेच्या आमदारांबरोबरच आमदार सुजितसिंह ठाकूर, औश्याचे काँग्रेस आमदार बसवराज पाटील, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, यवतमाळचे तानाजी सावंत तसेच शिक्षक आमदार विक्रम काळे हे देखील विधानपरिषदेच्या रूपाने जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे आता यावेळी आघाडीला या ठिकाणी जिंकण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यातील उस्मानाबाद, परंडा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असून तुळजापूर आणि उमरगा काँग्रेसकडे आहे. तर युतीमध्ये तीन मतदारसंघ शिवसेनेकडे असून एकच मतदारसंघ भाजपकडे आहे.

1) उस्मानाबादमधून कोण विजयी होणार
या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला तिकीट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.  शिवसेनेकडून याठिकाणी कैलास पाटील यांना उमेदवारी  देण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी येथे अतिशय तुल्यबळ लढत होणार आहे. मात्र त्याचबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सलक्षणा सलगर, तसेच जिल्ह्यातील अनेक नेते याठिकाणी इच्छुक असून कुणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

2) भूम-परंडा-वाशी विधानसभा
या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटे आणि विद्यमान मंत्री तानाजी सावंत यांच्यात लढाई होणार आहे. त्यामुळे आता या ठिकाणी देखील टक्करची लढाई होणार आहे. लक्ष्मीपुत्र तानाजी सावंत यांच्यासमोर तीन वेळा विजयी झालेल्या राहुल मोटे हे कसे आव्हान उभे करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील दोन्ही तुल्यबळ उमेदवारांपैकी एकालाच विधानसभेत जात येणार आहे.

3) तुळजापूर  विधानसभा
तुळजापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघातून विद्यमान आमदार मधुकर चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले राणाजगजितसिंह पाटील एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे यावेळी येथे अतिशय तुल्यबळ लढत होणार आहे. याआधी मधुकर चव्हाण चारवेळा विजयी झाले असून त्यांनी या मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक  केली आहे. मात्र यावेळी त्यांचा अश्वमेध रोखण्यासाठी राणाजगजितसिंह पाटील हे इच्छुक आहेत. त्यामुळे या दोन्ही दिग्गज नेत्यांपैकी मात्र एकालाच विधानसभेत आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जगदाळे हे वंचित बहुजन आघाडीकडून रिंगणात असण्याची शक्‍यता आहे.

4) उमरगा
याठिकाणी शिवसेनेचे प्राबल्य असून आमदार ज्ञानराज चौगुलेंनी सलग दोन वेळा विजय  मिळवला आहे. त्यामुळे यावेळी देखील तेच याठिकाणी उमेदवार आहेत. त्यामुळे आता याठिकाणी काँग्रेस कुणाला तिकीट देणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. याठिकाणी देखील तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.