‘मावळ की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम’, ते दाखवून द्या : मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – मावळमध्ये जास्त दम आहे की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम आहे, हे दाखवून द्या. रोहित पवार नावाचे पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कर्जत तालुक्यातील सिद्धटेक येथील जाहीर सभेत बोलताना केले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पार्थ पवार नावाचे पार्सल मावळच्या जनतेने घरी पाठवले. आता रोहित पवार नावाचे पार्सल घरी पाठवण्याची जबाबदारी कर्जत-जामखेडमधील जनतेवर आहे. हे पार्सल परत पाठवून द्या. मावळमध्ये जास्त दम आहे की कर्जत-जामखेडमध्ये जास्त दम आहे, हे दाखवून देण्याची वेळ आता आली आहे.

आम्हाला मत दिले नाही, तर तुमचा ऊस नेणार नाही, अशी भाषा वापरणाऱ्याला शेतकरी गाडून टाकेल. धमक्या देऊन शेतकरी मते देणार नाहीत. शेतकऱ्यांनो काळजी करू नका. आमचे सरकार आहे. राम शिंदे हे दुसरा कारखाना उभा करतील. शेतकऱ्याला दमदाटी करून मते मागणारे रोहित पवार यांना पुन्हा बारामतीला पाठवून देण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

Visit : Policenama.com