आघाडीचं जागा वाटप ‘पक्‍क’, ‘मनसे’ला ‘डच्चू’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यात विधानसभेची तयारी जोरदार पद्धतीने सुरु झाली आहे. सर्वच पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढणार असल्यामुळे दोघांच्याही जागांचा फॉर्म्युला फिक्स झाल्याचं समजतंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी १२५ जागांवर येणाऱ्या विधानसभेमध्ये आपलं नशीब आजमावणार आहेत अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.

आघाडीच्या जागांसोबतच मित्रपक्षाला ३८ जागा दिल्या जाणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही आघाडीचे जागावाटप निश्चित झाले असल्याचे नाशिकमधील पत्रकार परिषदेत सांगितले.

गेल्या लोकसभेला मनसेने निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले नव्हते. मात्र मोदी सरकारविरोधात जोरदार प्रचारसभा घेतल्या होत्या. यावेळेस मनसे आघाडीसोबत जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून होते. मात्र मनसेला सोबत घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.

मनसे येणारी विधानसभा लढवणार नसल्याच्याही बातम्या काही दिवसांपूर्वी येत होत्या. मात्र अधिकृतपणे त्याबाबत मनसेकडून कोणतेही वृत्त आलेले नाही. जरी मनसे निवडणूक लढणार नसली तरी लोकसभेप्रमाणे सरकार विरोधात प्रचार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र मनसे आघाडीसोबत नसल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले आहे.