माजी खा. गांधी यांची ठाकरेंच्या सभेलाही दांडी : पक्षप्रमुखांच्या सभेनंतरही राठोड अस्वस्थच

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज नगर शहरात माजी आमदार शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेत माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र तरीही अनिल राठोड यांची अस्वस्थता कायम आहे. माजी खासदार दिलीप गांधी यांनी ठाकरे यांच्या सभेत दांडी मारली. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीतही गांधी उपस्थित नव्हते. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होऊही राठोड हे अस्वस्थच आहेत.

नगरची जागा भाजपला मिळावी, यासाठी माजी खासदार दिलीप गांधी हे आग्रही होते. ‘शिवसेनेचे कोणीही चालेल. परंतु राठोड चालणार नाही’, अशी जाहीर भूमिका गांधी यांनी घेतली होती. मात्र युतीच्या उमेदवारीची माळ राठोड यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे माजी खासदार दिलीप गांधी व त्यांचे समर्थक महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. माजी खासदार गांधी यांची मनधरणी करण्यासाठी अनिल राठोड यांनी अनेक प्रयत्न केले. तरीही तोडगा निघू शकला नाही. भाजपातील एक मोठा गट राठोड यांच्या उमेदवारीवर नाराज असल्याने शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची अस्वस्थता वाढत चालली आहे.

महायुतीची उमेदवारी मिळाली असली, तरी अंतर्गत गटबाजीमुळे राठोड यांना ही निवडणूक सोपी जाणार नाही. कुणाकडूनही ऐनवेळी दगाफटका होण्याची शक्यता आहे. अंतर्गत पातळीवर राठोड यांना आव्हान देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राठोड गटाची धाकधूक वाढली आहे.

Visit : Policenama.com 

You might also like