विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदार संघात मतदान व मतमोजणीची प्रशासनाने जय्यत तयारी केली असून प्रशासनाने केलेल्या तयारीचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घेतला.

विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राम यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांच्यासह सहायक निवडणूक अधिकारी व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मतदान साहित्य वितरण, मतमोजणी केंद्र व स्ट्राँगरुम, दिव्यांग मतदारांना सुविधा, मतदान केंद्राचे वेब कास्टींग, मतदार चिठ्ठी वाटप, ईव्हीएम मशीनची मागणी, मतदान अधिका-यांचे प्रशिक्षण, सी-व्हीजील व मतमोजणीची व्यवस्था, तात्पुरते मतदान केंद्र उभारणी, मतदान केंद्रावरील सुविधा या विषयाचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला.

जिल्हाधिकारी राम म्हणाले, मतदानासाठी लागणाऱ्या साहित्य वितरणाचे नियोजन काळजीपूर्वक करण्यात यावे. ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र काळजीपूर्वक हाताळण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. दिव्यांग, वृध्द व महिला मतदारांसाठी विविध सुविधा पुरविण्याचे आयोगाचे आदेश आहेत.

त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 21 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान सुरु होण्याअगोदर राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीसमोर करण्यात येणारे मॉक पोल काळजीपूर्वक करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात याव्यात. त्याचप्रमाणे आयोगाने दिलेले विविध अर्जाचे नमुने वेळोवेळी भरण्यात यावे, असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.

Visit : Policenama.com