मावळात ‘कमळ’ फुलणार की ‘घड्याळा’चा गजर !

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन –प्रतिष्ठेचा झालेल्या आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या मावळ मतदारसंघात चुरशीची लढाई होत आहे. विद्यमान आमदार, राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांना भाजपने तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन हॅट्ट्रिक साधण्याची संधी दिली आहे. तर उमेदवारी डावल्याने नाराज झालेल्या सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेत उमेदवारी पदरात पाडून घेतली. त्यामुळे मावळ मध्ये निष्ठावंत विरुद्ध बंडखोर अशी लढत होत असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या सुनील शेळके यांचा पत्ता कट करून भेगडे यांना पुन्हा उमेदवारी मिळाली. हेच टायमिंग साधत राष्ट्रवादीने शेळके यांना पक्षात घेऊन त्यांना उमेदवारी देऊन भेगडे यांना तगडे आव्हान दिले. शेळके हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक आहेत. नगरपरिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा दावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर बाळा भेगडे हे हॅट्ट्रिक करणार असा दावा भेगडे यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

तर दुसरीकडे, तालुक्यात दोन टर्म आमदार असलेले दिगंबर भेगडे यांचा पुतण्या रवींद्र भेगडे यांनाही पक्षाकडून डावललं गेल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. याचा फायदा कदाचित शेळके यांना होऊ शकतो. त्यातच गणेशोत्सवामध्ये वाद झाले होते. शेळके यांचा दांडगा जनसंपर्क आणि तरुण मतदारांचा पाठिंबा यामुळे शेळके यांनी विजयाचा दावा केला आहे. मात्र, सलग दोन वेळा आमदार झालेले आणि निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिपद मिळालेल्या भेगडे यांचे कडवे आव्हान शेळके यांच्या समोर आहे. निवडणूक निकालाला काही तासच राहिले असून मावळचे मतदार मावळे कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात ते लवकरच सजमजेल.

Visit : Policenama.com