तुळजापूरमध्ये युतीच्या बॅनरवरून खासदार ओमराजे ‘गायब’

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात तुळजापूर विधानसभा युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ अमित शहा यांनी गुरुवारी (दि. 10) सभा घेतली. विशेष म्हणजे 2014 च्या विधानसभा निवडणूकीत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन भाजपाचे उमेदवार संजय निंबाळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती. मात्र त्यावेळी भाजपाचा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला होता. यावेळी अमित शहा यांनी सभा घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या सभेमुळे भाजपा उमेदवाराचा विजय की पराजय याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे. विशेष म्हणजे शहांच्या सभेसाठी लावण्यात आलेल्या युतीच्या बॅनरवर खासदार ओमराजे यांचा फोटो गायब झाला आाहे. त्यामुळेच की काय? सेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी या सभेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे युती असतानाही सेना-भाजपाच्या पदाधिकार्‍यांचे अद्याप सुत जुळल्याचे दिसून येत नाही.

जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. त्यात तुळजापूर विधानसभा मतदार संघही मागे राहिलेला नाही. या मतदार संघातील निवडणूकीकडे अख्या राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणूकीत राज्याचे माजी दोन मंत्री तथा विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील व आ. मधुकरराव चव्हाण यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे या दोन माजी मंत्र्याच्या प्रचारार्थ तुळजापूरात गुरुवारी (दि. 10) भाजपाकडून देशाचे गृहमंत्री अमित शहा तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची सभा झाली. 2014 च्या निवडणूकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. त्यात तुळजापूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादीकडून जीवनराव गोरे, भाजपाकडून संजय निंबाळकर तर सेनेकडून सुधीर पाटील हे लढले होतेे. त्यावेळी भाजपा उमेदवार यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुळजापूर येथे जाहीर सभा झाली होती. त्या सभेत मोठा प्रतिसादही मिळाला होता.  मात्र आ. चव्हाण यांनी विजय खेचून आणला होता. राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे दुसर्‍या क्रमांकावर तर तत्कालीन भाजपाचे उमेदवार संजय निंबाळकर हे तिसर्‍या स्थानावर फेकले गेले. त्यामुळे आता 2019 च्या निवडणूकीसाठी भाजपाकडून राणाजगजिसिंह पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली. या सभेस मोठा प्रतिसादही मिळाला आहे.

परंतू मतदार संघातील नागरिकांना 2014 च्या निवडणूकीतील मोंदीच्या सभेची आठवण लक्षात आल्याने या सभेबाबतही नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे आ. पाटील यांना युतीतील मित्र पक्ष असलेल्या सेना किती मदत करणार ? तसेच मुळ राष्ट्रवादीचे असलेले महेंद्र धुरगुडे, अशोक जगदाळे हे कोणाची व किती मतदान खेचणार यावर या मतदार संघातील गणित अवलंबून राहणार आहे.

Visit : Policenama.com