निवडणुका कुणासोबत लढायच्या आहेत हेच कळत नाही : मुख्यमंत्री फडणवीस

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा 2019 च्या निवडणुका कुणासोबत लढायच्या आहेत हेच खरंच कळत नाही आहे. आमचे पैलवान तयार आहेत पण पुढे कुणीच नाही. बालेकिल्ला असणाऱ्या राष्ट्रवादीला चिंचवड आणि भोसरी मतदार संघात उमेदवार मिळू नये यापेक्षा दुर्देव काय असावे अशी टिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रहाटणी पिंपरी चिंचवड येथे केली.

महायुतीचे चिंचवड मतदार संघातील उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणी येथे जाहिर सभा घेण्यात आली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, महापौर राहुल जाधव, पक्षनेते एकनाथ पवार, शिवसेना-भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, संजय भेगडे, गौतम चाबुकस्वार उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले; एकडे निवडणुकीची धामधूम सुरु असताना तिकडे काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. शरद पवारांची अवस्था तर ‘शोले’ सिनेमातील ‘जेलर’साखी अर्थात ‘आधे इधर जावं आधे उधर जावं बाकी मेरे साथ आव’, अशी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामागे कुणीही नाही.

गुंतवणुकीबाबत 5 व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे. देशातील 25 टक्के रोजगार महाराष्ट्रात निर्माण झाले आहेत. 35 लाख रोजगार महाराष्ट्रात तयार झाले असून महाराष्ट्र रोजगार निर्मितीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला. कुणाला शंका असेल तर केंद्र सरकारची वेबसाईट बघा, असा अजब दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

‘मी उमेदवार निवडून द्या म्हणून सांगायला आलो नाही. उमेदवार तर निवडून येणारच आहेत. मी तुम्हाला हे विचारायला आलो आहे की तुम्ही रेकॉर्ड करणार आहात काय. 24 तारखेला पुन्हा मी येईन आणि तुम्ही रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून दिले नाही तर तुम्हाला त्याचा हिशेब द्यावा लागेल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी चिंचवडमधील मतदारांना सांगितले. रेकॉर्ड ब्रेक मतांनीच महायुतीचा उमेदवार निवडून द्याल, असा विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

visit : policenama.com