राज्यात महाविकासचं ‘सरकार’ टिकणार नाही, काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याकडून घरचा ‘आहेर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते आणि माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. असे असतानाच महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसमध्ये सर्व काही व्यवस्थित असल्याचे चित्र पहायला मिळत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विरोधकांकडून हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे बोलले जात आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील काँग्रेसच्या एका नेत्यानेच हे सरकार फारकाळ टिकणार नसल्याचे सांगत घरचा आहेर दिला आहे.

मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी सरकारबाबत वक्तव्य करत काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्रात कोणत्याही आधाराशिवाय तीन वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांचे सरकार आहे. अनेक बाबींवर या सरकारचे एकमत होत नाही. त्यामुळे हे सरकार टिकणे अवघड असल्याचे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. तसेच 22 आमदारांनीही विधानसभाध्यक्षांकडे राजीनामा पाठवून दिल्याने काँग्रेस अल्पमतात आली आहे. यावर प्रतिक्रिया देताना निरुपम यांनी स्वत:च्याच पक्षावर निशाणा साधला आहे. शिंदे यांच्या हालचालींवर दिल्लीतल्या ज्येष्ठ नेत्यांचे लक्ष होते. या नेत्यांनी वेळीच त्यांना का आवर घातला नाही ? असा सवाल निरुपम यांनी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचं तीन चाकाच सरकार असून हे सरकार कधीही कोसळू शकते. तसेच तीन पक्षातील नेत्यांमध्ये एकमत नसून त्यांच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्याने हे सरकार कधीही पडू शकते, असा दावा नेहमीच विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, आता थेट सत्ताधारी पक्षातील नेत्यानेच असे विधान केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.