वनीकरण क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर राहील : वनमंत्री मुनगुंटीवार

भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – यावर्षी राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. या मोहीमेमुळे वनीकरण क्षेत्रात महाराष्ट्राला देशात आघाडी घेण्याची संधी मिळेल असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

गोखलेनगरमधील मेंढी फार्म येथील भांबुर्डा वन उद्यानाचे लोकार्पण मुनगंटीवार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार विजय काळे होते. याप्रसंगी महापौर मुक्ता टिळक, मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, नगरसेवक आदित्य माळवे आदी उपस्थित होते.

या परिसरातील नागरिकांना फिरण्यासाठी हे उद्यान उपयुक्त ठरेल. उद्यानाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी दोन कोटी च्या निधीची आवश्यकता आहे. तो मिळवण्यासाठी पाठपुरावा करु असे आमदार काळे यांनी सांगितले.

मॅफको कंपनीच्या १४ एकर जागेवर हे उद्यान विकसित करण्यात आले आहे. आयुष वन, गणेश वन, सुगंधी वन, नक्षत्र वन, पंचवटी वन, औषधी वन अशी विविध प्रकारची १४ वने विकसित करण्यात आली आहेत. त्यात १४ हजार वृक्ष, वेलिंची लागवड करण्यात आली आहे.

भांबुर्डा वनविभागात या जागेवर मॅफको कंपनी होती. त्या कंपनीचा करार संपल्यावर ही जागा ओसाड पडली होती. तिथे कचऱ्याचे साम्राज्य तयार झाले होते. येथील स्वच्छतेसाठी अनिरुद्ध उपासना केंद्राचे स्वयंसेवक, शाळा – कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे योगदान मिळाल्याचे आमदार काळे यांनी सांगितले. उद्यान निर्मितीसाठी एक कोटी बहात्तर लाख रुपये खर्च झाला आहे.