‘सरकार कधी पडणार याचे मुहूर्त पाहण्यात विरोधकांचा वेळ गेला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना संसर्गाचा सामना करत असताना हे सरकार कधी पडणार याचे मुहूर्त बघण्यात विरोधकांचा वेळ गेला, असा सणसणीत टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते वार्ताहरांशी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.

राज्यात अघोषित आणीबाणीसदृश्य परिस्थिती उद्भवल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर महाराष्ट्रात जर अघोषित आणीबाणी असेल तर मग देशात घोषित आणीबाणी आहे का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी त्यांच्या हक्कांसाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यांच्यासोबत नीट बोलणे, त्यांच्या भावना समजून घेणे, या बाबी तर सोडाच मात्र भर थंडीत उघड्यावर बसावे लागत आहे. त्यांच्यावर थंडगार पाण्याचे फवारे मारले जात आहे.

आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे सर्व एकदाच ठरवा. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणे हे आपल्या संस्कृतीत बसत नाही, असेही ठाकरे यांनी म्हटलं.

कोरोना काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, कोरोनादरम्यान जे काही झाले त्यातून आपण मार्ग काढत असून, विरोधकांनी या काळात फक्त राजकारण केले. टाळेबंदीदरम्यान राज्य सरकारच्या तिजोरीवर भर पडला. अद्यापही केंद्राकडून राज्याला २८ हजार कोटी येणे बाकी असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

सरकारने कोणती कामे केली, ते विरोधकांना दिसले नसेल तर त्यांनी गेल्या वर्षी काय कामे झाली त्याची पुस्तिका नुकतीच सरकारने महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली आहे. जनतेमध्ये सरकारबाबत कुठेही नाराजी अथवा असमाधान असल्याचा सूर दिसत नाही. विरोधी पक्षांच्या नावातच विरोधी आहे. त्यामुळे त्यांना विरोधी या शब्दाला जागावे लागते. ते जे काही म्हणताय ते त्यांच्यापुरते बरोबर आहे, असे सुद्धा उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.