
रमजान ईदनिमित्त धार्मिक कार्यक्रम घरातच करा, गृहविभागानं जारी केली गाईडलाइन
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय वा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुस्लीम धर्मियांचा पवित्र सण रमजान ईद घरीच साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून गृह विभागाने काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
रमजान महिन्यास १३ एप्रिलपासून सुरुवात झाली. चंद्रदर्शनावर उद्या (दि.१३) किंवा परवा (दि.१४) रमजान ईद (इद उल फित्र) साजरी केली जाणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने १३ एप्रिलला काढलेल्या आदेशातील तरतुदीनुसार खबरदारी घेत रमजान ईद साजरी करणे आवश्यक आहे. त्यानुसार गृह विभागाने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.
१) कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईदसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपआपल्या घरातच साजरे करुन कोरोना नियमांचे पालन करणे उचित ठरेल.
२) मशिदीत तसेच मोकळ्या जागेत नमाज पठणासाठी एकत्र येऊ नये.
३) मुंबई महापालिकेने तसेच स्थानिक प्रशासनाने ईदनिमित्त खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिले आहे. त्याचे तंतोतंत पालन करावे, जास्त गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.
४) कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्यात कलम १३३ लागू केले असून रात्रीची संचारबंदी आहे. त्यामुळे संचारबंदीच्या काळात फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत. विनाकारण रस्त्यावर फिरु नये.
५) रमजान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतीक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. रमजान ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने मुस्लीम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी जनजागृती करावी.
६) रमजान ईदच्या दिवशी फिजिकल डिस्टन्सचे पालन करणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे.
७)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत आणि पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहीत केलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर आणि प्रत्यक्ष रमजान ईदच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचेही पालन करावे.