‘महाराष्ट्राची लोकधारा’च्या माध्यमातून संस्कृतीची जपणूक

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – लोकनेते दत्ताजी पाटील यांच्या चोविसाव्या स्मृती सोहळ्यानिमित्त लासलगाव येथे प्रा.बी.आर. चव्हाण निर्मित मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमात लोकसंगीताचा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्राची लोकधाराचे आयोजन करण्यात आले.

महाराष्ट्राची संस्कृती लोप पावू नये त्या संस्कृतीला उजाळा मिळावा म्हणून झी युवा वाहिनी वरील युवा सिंगर एक नंबर फेम व संस्थेचा माजी विद्यार्थी जगदीश चव्हाण तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून संस्थेच्या संचालिका निताताई पाटील व पं.स. सदस्या रंजनाताई पाटील यांच्या संकल्पनेतून सुश्राव्य अशा महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कलावंतांनी संस्कृतीला उजाळा मिळावा म्हणून गणेश वंदना, गवळण, भूपाळी, ओवी, धनगरी गीत, कोळीगीत, लोकगीत, गोंधळ, भारुड, पोवाडा, मुरळी, वारकरी, मंगळागौर, पोतराज आणि कडकलक्ष्मी, पिंगळा, लावणी, जागर, भैरवी असे लोकसंगीतातील अस्सल सुश्राव्य गीत प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे उद्घाटन ललिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय मनोगतात अनिता अहिरे यांनी सांस्कृतिक परंपरांचे महत्त्व सांगून संस्कृतीचे जतन करावे असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथींमध्ये लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप, सविता दायमा, सीमा कुलकर्णी, मनिषा ठाकरे, शगुफ्ता पठाण, पुष्पाताई दरेकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना पानगव्हाणे, श्रीहरी शिंदे, प्रतिभा डोंगरे, रेश्मा वैष्णव यांनी विशेष कष्ट घेतले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, शंतनू पाटील, सिताराम जगताप, प्रकाश जोशी, विजय चव्हाण, प्राचार्य बाबासाहेब गोसावी, मुख्याध्यापिका सुधा आहेर, मुख्याध्यापक अनिस काजी, पर्यवेक्षिका संजीवनी पाटील, रोशनी गायकवाड यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.