महाराष्ट्रातील जवानाला हेरगिरीप्रकरणी अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या एजंटला सीमेवरील कुंपण आणि रस्ते यांच्या छायाचित्रांसारखी गोपनीय माहिती पुरवल्याचे आढळून आल्याने सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला अटक करण्यात आली आहे. शेख रियाझुद्दीन असे या जवानाचे नाव असून, तो मूळचा महाराष्ट्रातील जालन्याचा आहे.

शेख रियाझुद्दीन हा महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील रेणापूरचा रहिवासी असून तो पंजाबमधील फिरोझपूर सेक्टरमध्ये बीएसएफच्या २९व्या बटालियनमध्ये तैनात होता. रियाझुद्दीनच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याच्यावर बीएसएफने पाळत ठेवली होती. हेरगिरीचा ठोस पुरावा हाती लागल्यानंतर दोन मोबाईल फोन आणि सात सीम कार्डसह पोलिसांनी त्याला अटक केली. रियाझुद्दीनने सीमेवरील कुंपण व रस्ते, बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक आणि इतर काही गुप्त माहिती आयएसआयचा एजंट मिर्झा फैजल याला दिल्याचा आरोप आहे.

देशासाठी बलिदान देणारा आणि वीरजवानांचे राज्य म्हणून देशात नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रातील जवानाने केलेले हे कृत्य लाजिरवाणे आणि संतापजनक ठरले आहे. काही दिवसांपूर्वीच लष्करप्रमुखांनी राज्यातील जवानांच्या वीरतेचे, पराक्रमाचे जाहिर कौतूक केले होते. त्यानंतर घडलेला हा प्रकार उद्वीग्न करणारा आहे.