राज्यातील मेट्रो प्रकल्प 10 वर्षातच पांढरे हत्ती ठरतील : जयंत पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये मेट्रो सुरू करण्यात आली परंतु सध्या जर परिस्थिती पाहिली तर त्या मेट्रोचा उपयोग अतिशय कमी लोक करतात हीच परिस्थिती इतर ही शहरांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाहायला मिळेल. पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये सुरू करण्यात येणाऱ्या मेट्रो या दहा वर्षातच पांढरे हत्ती ठरते आणि त्याचा बोजा राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर पडेल असे मत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे नृसिंह उर्फ राजाभाऊ चितळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ ‘भारतीय अर्थव्यवस्थेतेतील महाराष्ट्राचे योगदान’ या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, बृहनमहाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स चे प्राचार्य चंद्रकांत रावळ आदी यावेळी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये आजही वेगाने आर्थिक परिस्थिती सुधारत आहे ती अधिक वेगाने सुधारण्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे गरजेचे आहे. यासाठी औद्योगिक धोरणामध्ये सुसूत्रता आणणे, उद्योजकांना वीज दर कामगार वेतन यामध्ये सवलत देणे तसेच स्थानिक राजकारण्यांकडून गुंतवणूकदारांना देण्यात येणारा त्रास कमी केला पाहिजे यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

ज्या राज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशा राज्यांना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येते परंतु जी राज्य स्वतःच्या बळावर विकसनशील झाली आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रगती झाली आहे अशा राज्यांना मात्र त्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत नाही. हा दुजाभाव कमी करण्यासाठी राज्याची कामगिरी लक्षात घेऊन त्या राज्यांना मदत केली पाहिजे. यासाठी केंद्रीय बजेट सादर करताना मागच्या वर्षी या बजेटमधून कोणत्या प्रकारचे रिझल्ट मिळाले. त्यानुसार आऊटपुट बजेटही मांडण्यात आले पाहिजे असेही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

प्रीती राजगुरू यांनी सूत्रसंचालन, प्राचार्य डॉ. रावळ यांनी प्रास्ताविक, डॉ. आसमा शेख यांनी परिचय, आणि इंद्रनील चितळे यांनी आभार मानले.