Coronavirus : डझनभराहून जास्त मंत्र्यांना ‘कोरोना’, सरकारी कार्यालये झाली ‘हॉटस्पॉट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत असून ठाकरे सरकारमधील ४३ पैकी डझनभरहून अधिक मंत्र्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अशात आता मंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्याच अनुषंगाने मंत्र्यांची कार्यालये कोरोनाची ‘हॉटस्पॉट’ बनल्याचे बोललं जात आहे.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, यांच्यासोबत धनंजय मुंडे, विश्वजित कदम, अब्दुल सत्तार, अस्लम शेख, हसन मुश्रीफ, संजय बनसोडे या मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यातून ते बरे झाले आहेत. तर वर्षा गायकवाड व नितीन राऊत उपचार घेत आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांच्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. म्हणून काही दिवस या मंत्र्यांची कार्यालये बंद होती. त्यातच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीवरील बंधने उठवण्यात आली आहे. त्यामुळे आमदारांसोबत येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वावरामुळे मंत्री कार्यालयात गर्दी वाढत आहे.

नागरिक आणि कार्यकर्त्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी केली आहे. मात्र, मंत्रालयात येणाऱ्या आमदारांसोबत १५-२० कार्यकर्त्यांचा घोळका तिथे फिरताना दिसतो. आमदार सही साठी मंत्र्यांच्या दालनात प्रवेश करतात, त्यावेळी कार्यकर्तेही दालनात घुसतात. त्यामुळे मंत्री कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात कोरोना संसर्गाचा धोका वाढत आहे. म्हणून मंत्री कार्यालयात बहुतांश अधिकारी मंत्रालयात येण्याचं टाळतात. मंगळवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक सातव्या मजल्यावर होती. त्यावेळी अधिकारी, कर्मचारी, पोलीस, आमदार, कार्यकर्ते यांची गर्दी दिसली.

मंत्रालय विभागांतही शिरकाव
मंत्रालयाच्या विविध विभागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. उद्योग विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली कोरोनाची चाचणी करुन घेतली. तर अनेक सनदी अधिकऱ्यांना सुद्धा कोरोनाची बाधा झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सुवाजता सौनिक यांचा अहवाल देखील सकारात्मक आला होता. सनदी अधिकाऱ्यांचे निवास असलेल्या इमारतींमध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like