स्मृती मानधना ICC Ranking मध्ये अव्वल स्थानावर

लंडन : वृत्तसंस्था – मराठमोळ्या स्मृती मानधनाने क्रिकेटविश्वात भारतीयांची मन उंचावली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने शनिवारी जाहीर केलेल्या क्रमवारीत मानधनाने वन डे क्रिकेटमधील महिला फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तिने तीन स्थानांची झेप घेत अव्वल स्थान गाठले. आयसीसीच्या टीममध्ये स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. न्यूझीलंडविरोधातील दमदार फलंदाजीच्या जोरावर स्मृतीने ऑस्ट्रलियाच्या एलिस पॅरी आणि मेग रॅनिंग्जला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. २०१८ मध्ये स्मृतीने दोन शतकांसह आठ अर्धशतके झळकावली आहेत. नुकतेच भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०१८ वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे.
वनडे मध्ये द्विशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला
स्मृतीने १० एप्रिल २०१३ रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून भारताच्या वन डे संघात पदार्पण केलं. या सामन्यात तिने २५ धावा केल्या होत्या. हा सामना भारताने ४६ धावांनी जिंकला होता.

स्मृती मानधना ही वन डे क्रिकेटमध्ये द्विशतक ठोकणारी पहिली भारतीय महिला आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळताना तिने गुजरातविरुद्धच्या सामन्यात ही कामगिरी केली. अंडर १९ स्पर्धेत बडोद्यात झालेल्या या सामन्यात स्मृतीने झंझावती खेळी करत अवघ्या १५० चेंडूत नाबाद २२४ धावा केल्या होत्या.