सरकारकडून शेतकऱ्याची ‘क्रूर’ थट्टा ; खात्यात जमा केलं केवळ ४ रुपयांचं ‘अनुदान’

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – दुष्काळाने शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल केलं आहे. अशातच हे सरकार शेतकऱ्यांचे आहे, त्यांच्यावर कधी आन्याय होवू देणार नाही असे सांगणाऱ्या सरकारने ऐन दुष्काळात शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसली आहेत. माढ्यातील एका शेतकऱ्याला फक्त ४ रुपयांचे अनुदान सरकारने देऊन शेतकऱ्याची क्रूर थट्टा केली आहे. त्यामुळे येथील शेतकरी वर्गात सरकारविरोधात मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे.

चार रुपये अनुदान देऊन थट्टा

याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, ढवळस गावातील शेतकरी पंडित इंगळे यांना राज्य सरकारने दुष्काळ निधीमार्फ़त केवळ ४ रुपये देऊ केले आहेत. इंगळे यांची एक एकर जमीन आहे. त्यांनी आपल्या जमिनीत उसाची लागवड केली होती. मात्र तो ऊस जळून गेल्यामुळे इंगळे यांनी त्या जमिनीवर तुरीच्या पिकाची लागवड केली होती. तुरही जळून गेल्यानंतर पंचनामा करायला आलेल्या तलाठ्याला ही वस्तुस्थिती त्यांनी दाखवली होती. मात्र सरकारकडून खरिपाला केवळ चार रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहे. सरकारने अनुदानाचे केवळ ४ रुपये देऊन क्रूर थट्टा केली आहे. असे इंगळे यांचे म्हणणे आहे. बॅंकेतून कमीतकमी ५०० रुपये काढता येतात. असे असताना सरकारने दिलेले चार रूपये कसे काढायचे, हा प्रश्न पंडीत इंगळे यांना पडला आहे .

आता आमचा वाली कोण ?

एकीकडे राज्यात भीषण दुष्काळ आहे, अशा स्थितीत पाण्याअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. दुष्काळात खरिपाच्या पिकांची हानी झाल्यामुळे शेतकरी उध्वस्त झाले आहेत. अशातच सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यावर सरकारने केवळ ४ रुपये अनुदान दिल्यामुळे आता आमचा वाली कोण ? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित केला जात आहे.