मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ; वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी अध्यादेश

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन  – वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा विद्यार्थांना आरक्षण लागू करण्याबाबत अध्यादेश आणला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश वादावर तोडगा काढण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून आत्तापर्यंत झालेले प्रवेश तसेच राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी मराठा आरक्षणातून प्रवेश घेतलेल्या परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे प्रवेश रद्द झालेल्या मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले होते. हा तिढा सोडविण्यासाठी आणि न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झालेल्या प्रवेशांना संरक्षण देण्यासाठी सरकारने अध्यादेशाचा मार्ग अवलंबला आहे. आज सकाळी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. अध्यादेश आता स्वाक्षरीसाठी राज्यपालांकडे जाईल आणि त्यांनी स्वाक्षरी केल्यावर अध्यादेश लागू होईल, असे पाटील यांनी सांगितले.

१९५ विद्यार्थी वैद्यकीय पदव्युत्तर आणि ३२ विद्यार्थी दंतवैद्यकीय या शाखेतील असून त्यांच्यासाठी जागा वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे तसेच पदव्युत्तर वैद्यकीयची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने २५ मेपर्यंत मुदत दिली असून ती ३० मे पर्यंत वाढवून देण्याची विनंती करणारा अर्ज सरकारने न्यायालयात केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडे वैद्यकीय प्रवेशासाठी जागा वाढवून देण्याबाबतही राज्य सरकारनं मागणी केली आहे. १२ दिवसांपासून वैद्यकीय प्रवेशासाठी आरक्षण लागू करावं यासाठी विद्यार्थी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत.