‘CAA’ ला पाठिंबा पण ‘NRC’ राज्यात लागू होऊ देणार नाही : CM ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला (सीएए) पाठिंबा दर्शवला आहे. तर राष्ट्रीय नगरिक नोंदणीला (एनआरसी) विरोध केला आहे. एनआरसी महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेनेच्या मुखपत्रासाठी दिलेल्या मुलाखतीतून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर राऊत यांनी पहिल्यांदाच मुखमंत्र्यांची मुलाखत घेतली आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशातील कोणत्याही नागरिकाचं नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही. मात्र, महाराष्ट्रात एनआरसी लागू होऊ देणार नाही. एनआरसी लागू झाल्यास हिंदू आणि मुस्लीम अशा दोघांनाही नागरिकत्व सिद्ध करण्यात खूप अडचणी येऊ शकतात. मी असे होऊ देणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून हिंदुत्वाचा नारा पुन्हा एकदा बुलंद केला. त्यांनी म्हटले, आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आणि कधीही सोडणार नाही. महाराष्ट्रात आम्ही आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. याचा अर्थ असा होत नाही की आम्ही धर्म बदलला आहे. हिंदुत्वाच्या विचारधारेशी आम्ही कुठलीही तडजोड केलेली नाही. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत काही दिवसांमध्ये प्रकाशित होणार आहे.