महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला ? ‘गृह’ खातं राष्ट्रवादीकडे तर इतर खाते वाटपाबाबत देखील ठरलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच महाशिवआघाडीची समन्वय बैठक नुकतीच पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार, या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाली. खातेवाटप सर्वांच्या सहमतीनं होणार आहे. महत्त्वाची 4 खाती आणि ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येणार अशी शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृह खातं हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असणार आहे.

खातेवाटपाबद्दल सांगायचे झाले तर, ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्रामविकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात. गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे तर नगरविकास, जलसंपदा आणि एमएसआरडीसी ही खाती तिसऱ्या पक्षाकडे असतील अशी चिन्हं आहेत.

काल तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता स्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसुदा तयार केला. या बैठकीला काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ आणि नवाब मलिक तर शिवसेनेचे सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. बैठकीत तयार करण्यात आलेला मसुदा तीनही पक्षांच्या प्रमुखांना पाठवण्यात येणार आहे. समन्वय समितीतील तीनही पक्षातील नेत्यांनी माध्यमांना याबाबत माहिती दिली.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना नवाब मलिकांनी मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडं असल्याचं म्हणत मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. किमान समान कार्यक्रम काय तसेच कोणाला किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार याची वाटाघाटी सध्या सुरू आहे.

Visit : Policenama.com