महाशिवरात्री : 8 दिशा, 8 शिवलिंग, 8 राशींशी संबंध, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – हिंदू परंपरा, चालीरिती, धार्मिक कार्य यांना अनन्य साधारण महत्व आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथाचे लोक राहतात. एकमेकांच्या सणात ते सहभागी होतात. हिंदु संस्कृतीत असाच एक सण आहे तो म्हणजे महाशिवरात्रीचा. देशभरात महादेवाचे भक्त मोठ्या संख्येने आहेत. या दिवशी लाखो भक्त शिवलिंगाची पूजा करतात. देशातील विविध भागात शिवलिंगाची स्थापना केल्याचे आढळते. शिवलिंगाचे महत्व शिवपुराणात अधोरेखित आहे. त्यात शिवलिंग प्रथम कुठे प्रकटले याचा उल्लेखही आढळतो.

अरुणाचलेश्वर महादेव मंदिर –
तमिळनाडूतील अन्नामलाई पर्वतात अरुणाचलेश्वरचे मंदिर आहे. याच ठिकाणी प्रथम शिवलिंग प्रकटले अशी मान्यता आहे. या मंदिरात नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात कार्तिगई दीपम नावाचा मोठा उत्सव साजरा केला जातो.

अग्नीस्तंभाचे प्रतिक –
महाशिवरात्रीला या मंदिरात शिवभक्त मोठी गर्दी करतात. पर्वताच्या शिखरावर तुपाचा दिवा प्रज्जवलित केला जातो. याला अग्निस्तंभाचे प्रतिक मानले जाते. शिवपुराणानुसार, देवाधिदे महादेव पहिल्यांदा अग्निस्तंभ रुपात पृथ्वीवर अवतरले.

अष्ट दिशा, अष्ट शिवलिंग, अष्ट राशी –

अरुणाचलेश्वर मंदिरात 8 दिशांना 8 शिवलिंग स्थापन झाली असून, ती वेगवेगळ्या नावाने ओळखली जातात. या शिवलिंगाचा संबंध राशींबरोबर असल्याची मान्यता आहे. इंद्रलिंगम आणि नैऋत्य लिंगम नावाच्या शिवलिंगाचा मेष राशीशी संबंध आहे. अग्निलिंगम नावाच्या शिवलिंगाचा सिंह राशीली संबंध आहे. यम लिंग शिवलिंगाचा वृश्चिक राशीशी संबंध आहे. वरुण लिंगम शिवलिंगाचा मकर आणि कुंभ राशीशी संबंध आहे. कुबेर लिंगम नावाच्या शिवलिंगाचा धनु आणि मीन राशीशी संबंध आहे. ईशान लिंगम नावाच्या शिवलिंगाचा मिथुन आणि कन्या राशीशी संबंध आहे. या राशीच्या व्यक्तींना काही दोष, अडचणी, समस्या असतील तर ते या ठिकाणी येऊन विशेष पूजा करतात.

पौराणिक कथा –

अरुणाचलेश्वर मंदिरासंंबंधित एक पौराणिक आढळून येते. कैलाश पर्वतावर असताना एकदा पार्वती देवीने शंकराचे डोळे आपल्या हाताने झाकले. तत्क्षणी संपूर्ण ब्रह्मांड अंधारले. त्यानंतर अनेक वर्ष ब्रह्मांड अंधारातच होते. देवी पार्वती आणि अन्य देवतांनी कठोर तपस्या केली. याने शिवशंकर प्रसन्न झाले आणि अन्नामलाई पर्वत रांगेत अग्निच्या रुपात प्रकट झाले. याच भागाला अरुणाचलेश्वर मंदिराने ओळखले जाते. यानंतर शंकर आणि पार्वती अर्धनारीश्वर रुपात प्रकट झाले. अर्धनारीश्वर शंकर आणि पार्वतीचे मंदिर यात पर्वत रांगेत आहे.