जेजुरी गडावर महाशिवरात्री निमित्ताने लाखो भाविकांनी घेतले ‘त्रैलोक्य’ दर्शन

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) – महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर महाशिवरात्रनिमित्त मुख्य मंदिरात शिखरावरील स्वर्गलोकी, भूलोकी व पाताळलोकी (त्रैलोक्य) शिवलिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी शुक्रवारी (दि. २१) मोठी गर्दी केली होती. शनिवारी (दि .२२) देखील दर्शनासाठी तिन्ही दर्शन खुले राहणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.

मुख्य मंदिरातील स्वयंभू शिवलिंग हे दर्शनासाठी रोज खुले असते. मंदिराच्या शिखरावरील व मुख्य मंदिरातील तळ घरातील शिवलिंग हे केवळ महाशिवरात्री दिवशीच दर्शनासाठी उघडले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीला जेजुरी गडावर त्रैलोक्य दर्शनाची मोठी पर्वणी असते. हा लाभ घेण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी झाली होती.

धर्मवते हर्षवते वाङ्मीणे ज्ञानरूपे कलीदोष विनाशाय मार्तण्डाय नमो नमः |

जेजुरी नगरीत वर्षाकाठी आठ यात्रा भरतात. सोमवती अमावस्या, चैत्र पोर्णिमा, पौष पोर्णिमा, माघ पोर्णिमा, दसरा, चंपाषष्ठी व महाशिवरात्री. या यात्रेला लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. “जेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर नाना परीचे रचना रचिले अपार, जळी स्थळी नांदे स्वामी शंकर”. जेजुरीला दक्षिणेकडील काशी मानले जाते. कैलास पर्वतानंतर जेजुरी गडावर शंकर पार्वतीचे एकत्रित स्वयंभू शिवलिंग आहे. त्यामुळे महाशिवरात्री यात्रेला येथे वेगळे महत्व आहे.

जेजुरी गडाच्या मुख्य मंदिरावरील शिखरात असणारे शिवलिंग हे स्वर्गलोकी शिवलिंग मानले जाते. गडावरील मुख्य मंदिरातील स्वयंभू लिंग हे भूलोकी शिवलिंग मानले जाते आणि गाभाऱ्यातील मुख्य मंदिरा शेजारी असणाऱ्या गुप्त मंदिरातील तळ घरात असणारे शिवलिंग पाताळलोकी शिवलिंग मानले जाते. महाशिवरात्र उत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याप्रमाणेच जेजुरीमध्ये या उत्सवाला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. वर्षातून फक्त एकदाच तिन्ही शिवलिंगाचे दर्शन होत असल्याने भाविकांची अलोट गर्दी लोटते.

महाशिवरात्री निमित्ताने रविवारी (दि. २१) पहाटे एक वाजता महापूजा व अभिषेक झाल्यानंतर भाविकांना त्रैलोक्य शिवलिंग दर्शन खुले करण्यात आले. त्यानंतर हजारो भाविकांनी जेजुरी गडावर रांगा लावल्या होत्या. दिवसभर हजारो भाविकांनी दर्शन घेतले. हार, बेल, पाने, दवणा, फुले याबरोबरच देवाचे लेण असणारे भंडार खोबरे देवाला अर्पण करण्यात आले. जेजुरी येथील शिवाजी चौकात स्क्रीन लावून त्रैलोक्य दर्शनाची सुविधा देवसंस्थानने उपलब्ध केली आहे. श्री मार्तंड देवसंस्थानने प्रमुख विश्वस्त अशोकराव संकपाळ विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकडे, संदीप जगताप, तुषार सहाणे, राजकुमार लोढा, नगराध्यक्षा बिना सोनवणे, तहसीलदार रूपाली सरनोबत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे आदिंनी या उत्सवाचे नियोजन केले.

देवसंस्थानच्या वतीने सुलभ दर्शन, पाणी, स्वच्छता आदी सुविधा पुरवण्यात आल्या. जेजुरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.