महात्मा गांधी यांचे पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन

जोहन्सबर्ग : महात्मा गांधी यांचे मुळचे दक्षिण अफ्रीकेतील पणतू सतीश धुपेलिया यांचे कोरोना व्हायरस संसर्गसंबंधी गुंतागुंतीमुळे रविवारी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते आणि तीन दिवसांपूर्वी त्यांचा वाढदिवस झाला होता. त्यांच्या कुटुंबियांनी ही माहिती दिली.

धुपेलिया यांची बहिण उमा धुपेलिया-मेस्थरी यांनी या वृत्तास दुजोरा दिला की, त्यांच्या भावाचे कोविड-19 संबंधित गुंतागुंतीमुळे निधन झाले आहे. त्यांच्या भावाला निमोनिया झाला होता आणि त्यांच्यावर एक महिन्यापासून हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते आणि तिथेच त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले की, निमोनियाने एक महिन्यापासून पीडित असलेल्या माझ्या भावाचे निधन झाले. हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. आज सायंकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या कुटुंबात दोन बहिणी उमा आणि किर्ती मेनन आहेत, ज्या तिथेच राहतात.

हे तिनही भाऊ बहिण मणिलाल गांधी यांचे वारस आहेत, ज्यांना महात्मा गांधी आपले कार्य पूर्ण करण्यासाठी दक्षिण अफ्रीकेतच सोडून भारतात परतले होते.

You might also like