वॉशिंग्टनमध्ये महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना; खलिस्तानी झेंड्याने झाकला चेहरा

पोलीसनामा ऑनलाईन : कृषी कायद्यावरून पेटलेल्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता भारताबाहेर उमटताना दिसत आहे. दिल्लीत आंदोलन तीव्र होत असताना वॉशिग्टन येथील भारतीय दूतावाससमोर असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना समोर आली आहे. भारतीय दूतावासाने या घटनेची माहिती दिली आहे.

कृषी कायद्यांचा विरोध करताना गटाने खलिस्तानी झेंड्याने महात्मा गांधींचा चेहरा झाकून टाकला. दुतावसाने या घटनेचा निषेध केला आहे. शांती व न्यायाचे प्रतिक म्हणून बघितल्या जाणाऱ्या महात्म्याच्या विटंबनेचा आम्ही निषेध करतो, असे दुतावासाने म्हटले आहे. दूतावासाने अमेरिकेतील कायदा एजन्सीकडेही निषेध नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी केली जाणार असून, दोषींवर कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला देशाबाहेरूनही पाठिंबा मिळताना दिसत आहे. मात्र, वॉशिग्टनमध्ये कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी आलेल्या काही खलिस्तानी समर्थक आंदोलनकर्त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना केली. खलिस्तानी घटकांनी खलिस्तानी झेंडा पुतळ्यावर टाकत चेहरा झाकून टाकला.