पुणे जिल्हाधिकारी पदाच्या नियुक्तीवरून ‘महाविकास’मध्ये जोरदार रस्सीखेच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यासह पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली करण्यात आली. नवल किशोर राम यांची बदली झाल्यापासून हे पद मागील चार ते पाच दिवसांपासून रिक्त आहे. सोमवारी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र, यामध्ये पुणे जिल्ह्याधिकारी पदावर कोणाचीही नेमणूक करण्यात आली नसल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पुणे जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी कोणाकडे द्यायची यावरून आता महाविकास आघाडीत खलबतं सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांकडून जिल्हाधिकारी पदासाठी काही अधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. यातच पुणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, काही वर्षांपासून विरोधी पक्ष असलेल्या भाजपने राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात चांगलीच मुसंडी मारत राष्ट्रवादीला शह दिला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील सत्तासमिकरणं बदली. राज्यात तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन करून आघाडीचे सरकार स्थापन केले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद स्वत:कडे घेतले. स्वत: मुख्यमंत्र्यांनी पुणे दौऱ्यादरम्यान जिल्ह्यावर अजित दादांचे लक्ष असल्याचे सांगितले होते. परंतु, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदावरून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी पदावर कोणा एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होत नसल्याने अद्यापही हे पद रिक्तच आहे.

पुणे जिल्हाधिकारी पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश देशमुख यांचे नाव उचलून धरले असताना शिवसेनेकडून जी श्रीकांत यांच्या नावाचा आग्रह करण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीमधील तिसरा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने डॉ. योगेश म्हसे यांचे नाव पुढे केले असल्याची चर्चा आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाध्यपदावर नवीन नियुक्ती करण्यासाठी पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अजित पवार हे आपल्या मर्जीतील अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा नवा जिल्हाधिकारी कोण हे अद्यापतरी अधांतरीच आहे.