महाविकास आघाडी सरकारचे सगळे ‘पूल’ भक्कम, कोणताही धोका नाही : संजय राऊत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विरोधकांकडून हे सरकार फार काळ टीकणार नसल्याचे वक्तव्य केले जात आहे. यावर बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे हे सरकार पाच वर्षे चालणार असून आमच्या सरकारला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत बोलत होते. तसेच विरोधकांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत. उद्धव ठाकरे सरकारला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. या सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

संजय राऊत म्हणाले. शरद पवारांच्या पाठिंब्याने महाविघास आघाडीचे हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. पूल बिहारमध्ये पडलेत. आधीच्या सरकारने बांधलेले पूल पडले आहेत. आमच्या सरकारला काहीही धोका नाही. सगळे पूल भक्कम आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार पाच वर्षे चालणार यामध्ये कोणाच्याही मनात शंका नाही, असंही खासदार राऊत यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी काल पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेमुळे अजित पवार नाराज आहेत का असे विचारले असता संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे सरकारचा आधार आहेत. ते शरद पवारांच्या वक्तव्यामुळे नाराज नाहीत. शरद पवार यांनी त्यांच्या नातवाबाबत केलेलं वक्तव्य ही त्यांची व्यक्तीगत बाब आहे. मी यावर अधिक काय बोलणार. तसेच अजित पवार या सगळ्यामुळे नाराज आहेत या चर्चांना अर्थ नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले आहे.