आमचं सरकार 5 वर्ष टिकणार, ‘स्टॅम्प’ पेपरवर लिहून देऊ का ? : अजित पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असून हे सरकार पाच वर्षे टिकणार यात माझ्या मनात काहीही शंका नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस हे तीन पक्ष आणि त्यांनी स्थापन केलेली महाविकास आघाडी यांचे सरकार पाच वर्ष टिकणार यात माझ्या मनात मुळीच शंका नाही. तुम्ही म्हणत असाल तर स्टँपपेपरवर लिहून देतो, असे अजित पवार यांनी म्हटल आहे.

अजित पवार आज सकाळपासून नॉट रिचेबल होते. त्यामुळे ते नाराज असल्याची पुन्हा चर्चा एकदा रंगली होती. मात्र, त्यांनी प्रसारमाध्यमांना सामोरे जात नाराज नसल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही तर मी आज माझी बहिण सुप्रियासोबत शपथविधीसाठी जाणार आहे. माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही मी तुम्हाला नाराज दिसतो का ? असा प्रश्न अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला.

दरम्यान, मुंबईतील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर आज नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून शिवतीर्थावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आलं आहे. सुप्रसिद्ध कला-दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आलेल्या या व्यासपीठाला किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्ठित आणि अश्वारुढ प्रतिमा व्यासपीठाच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार आहे. तसंच, स्वराज्याची ‘शिवमुद्रा’ व्यासपीठावर कोरण्यात आली आहे. संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Visit : Policenama.com