‘महाविकास आघाडी म्हणजे अमर-अकबर-अँथनी’ : रावसाहेब दानवे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात स्थापन केलेली महाविकास आघाडी म्हणजे अमर, अकबर, अँथनीचं सरकार आहे. आम्हाला हे सरकार पाडायचं नाही. परंतु तेच जर एकमेकांच्या पायात पाय घालून पडलं तर आम्ही काय करणार ? असा जोरदार टोला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

रावसाहेब दानवे हे पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, “6 वर्षांपासून काँग्रेस आणि मित्र पक्षांना लोकांसमोर जाण्यासाठी कुठलाच मुद्दा नव्हता. आपली मलीन प्रतिमा स्वच्छ करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरत आहे. मोदी आणि तोमर यांनी लोकसभेत शेतकऱ्यांचा माल किमान किमतीला खरेदी करण्यात येईल असं जाहीर केलं आहे. असं असताना काँग्रेस पंजाब-हरियाणामध्ये आंदोलन करत आहे. मिनिमम सपोर्ट प्राईसनं खरेदीचा उल्लेख विधेयकात करा असं काँग्रेस म्हणतंय परंतु काँग्रेसनं देखील तसं केलं नव्हतं. मिनिमम सपोर्ट प्राईस हे मोदी सरकारचं धोरण आहे.”

पुढे बोलताना दानवे म्हणाले, “शेतकऱ्यांना सरकारनं मार्केटमधून मुक्त केलं आहे. आम्ही व्यापाऱ्यांचं वर्चस्व कमी करून स्पर्धा निर्माण केली. मार्केट कमिटीच्या बाहेर देखील एखादा व्यापारी शेतकऱ्याचा माल खरेदी करू शकतो. शेतकऱ्यांना आम्ही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मार्केट कमिटीत शेतकऱ्याला माल परत न्यावा लागत होता आता असं होणार नाही. मार्केट कमिटी, सरकार खरेदी बंद होणार नाही.”

दानवे असंही म्हणाले, “1 लाख कोटी रुपयांची तरतूद यंदाच्या बजेटमध्ये केली आहे. स्वामीनाथन आयोगाच्या 90 टक्के शिफारशी आम्ही लागू केल्या. कृषी विधेयकामुळं शेती क्षेत्रात मूलाग्र बदल घडणार आहे. कोल्ड स्टोरेजमुळं शेतकऱ्याच्या मालाची नासाडी थांबणार आहे. शेतकऱ्याचं उत्पादन डबल करण्याच्या धोरणाच्या दिशेनं ही पावलं आहेत. काँग्रेसचा कृषी विधेयकांबाबतचा प्रचार खोटा आहे.” असंही ते म्हणाले.