महाविकास आघाडी सरकार अल्पायुषी ठरेल : नारायण राणे

पोलिसनामा ऑनलाईन टीम – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष काही जनतेच्या भल्यासाठी एकत्र आलेले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याच्या हिताचा एकही निर्णय या सरकारने आतापर्यंत घेतलेला नाही. तिन्ही पक्षांत आता वाद-विवाद सुरू झाले असून, हे सरकार अल्पायुषी ठरेल, असे भाकीत भाजपचे खासदार नारायण राणे वर्तविले आहे.

राणे म्हणाले, राज्य सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात कमी पडत आहे. त्यामुळेच रुग्णांची व त्यामुळे होणार्‍या मृत्यूंची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. महाविकास आघाडी सरकारचा कारभार, शिवसेना, काँग्रेस, भाजप हा राजकीय प्रवास अशा विविध विषयांवर भाष्य केले.

प्रत्येक वेळी केंद्र सरकारने पैसे द्यावेत, एक लाख कोटी रुपये द्यावेत इतके ते बोलत राहतात. राज्य सरकारने मनात आणले तर एक लाख कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्रातून उभी राहू शकते. त्यासाठी सरकारने योग्यपद्धतीने काम केले पाहिजे. पण महाविकास आघाडी सरकारचे विविध नेते बोलतात एक व सरकार चालते भलतीकडेच. असे सरकार फार काळ चालत नाही, असे भाकीत राणे यांनी केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसर्‍यावर विसंबून न राहता स्वत: निर्णय घेतले पाहिजेत. चर्चा-सल्लामसलत जरूर करावी, पण नंतर निर्णय स्वत: घेतला पाहिजे व त्याची अंमलबजावणीही तातडीने केली पाहिजे.

रोनाच्या भीतीमुळे मंत्रालय-सरकारी कार्यालये बंद करून चालणार नाही. उलट जास्तीत जास्त कर्मचार्‍यांना कामाला लावले पाहिजे. सर्व प्रशासनाला केवळ आरोग्याच्या कामाला लावून चालणार नाही. करोनाच्या संकटामुळे निर्माण होणारा आर्थिक प्रश्न लक्षात घेऊन अधिकार्‍यांची वेगवगेळी पथके तयार करून त्यांना उद्योग-व्यवसाय सुरळीत करणे, आवश्यक असल्याचे राणे यांनी सांगितले.