‘सरकारचा करेक्ट कार्यक्रम करेन, मी माझ्या विधानावर ठाम, पण…’, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन – तौक्ते चक्रीवदाळाचा कोकणाला मोठा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्गमध्ये भीषण परिस्थिती ओढावली आहे. याच प्रार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, मी पंढरपूरच्या जनतेला दिलेला शब्द पाळणार आहे. सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार या माझ्या विधानावर मी ठाम आहे. पण सध्या ही वेळ नाही. आपण कोरोना संकटाशी लढा देत आहोत. आम्हाला कोरोनाशी लढायचे आहे, या सरकारशी नाही. ज्या दिवशी कोरोनाचा काळ संपेल तेव्हा मी माझा शब्द खरा करुन दाखवेन, असा विश्वास व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

सरकारला तोंड दाखवायला जागा उरणार नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, रश्मी शुक्ला यांचा जो अहवाल आहे, तो जर बाहेर आला तर या सरकारला तोंड दाखवण्यासाठी जागा उरणार नाही. त्यामुळे हे सरकार न्यायालयात गेले आहे आणि चौकशी करु नये, अशी विनंती करत आहे. हे सरकार त्यांच्याच अंतर्विरोधामुळे पडेल हे मी यापूर्वीच सांगितले होते, आता त्याची वेळ जवळ येत आहे. त्या दिशेने सरकारची वाटचाल सुरु असल्याचा दावा त्यांनी गेला.

तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान

तौक्ते चक्रीवादळामुळे सर्वदूर नुकसान झालेले नाही. मात्र काही ठिकाणी मोठे नुकसान झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. ज्या ठिकाणी मोठे नुकसान झाले त्या ठिकाणी मदत करण्याची गरज आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी राज्य सरकारने जशी मदत देली होती. तशीच यावेळी देखील द्यायला हवी होती. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. कोल्हापूर, साताऱ्यात महापूर आला होता. त्यावेळी आम्ही तात्काळ मदत दिली होती. मी स्वत: जाऊन पहाणी केली होती. मदतीची घोषणा करण्यापूर्वी माहिती घेऊन घोषणा करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

स्क्रिप्टमध्ये ठरल्याप्रमाणे केंद्रावर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचा दौरा केला. गुजरातमध्ये चक्रीवादळ धडकले आणि थांबले. ज्यावेळी चक्रीवादळ एखाद्या भागात धडकते तिथे प्रचंड नुकसान होते. गावच्या गाव जमिनदोस्त झाली. पंतप्रधानांनी मदतीची घोषणा केली. तसेच ज्या राज्यात नुकसान झाले आहे, त्याचा देखील उल्लेख केला आहे. तामिळनाडूचे याबद्दल कोणतीही मागणी केली नाही. गोव्यानेही तशी कोणतीही मागणी केली नाही. केवळ महाराष्ट्रातच काही नेते स्क्रिप्ट ठरल्याप्रमाणे केंद्रावर आरोप करत आहेत. केंद्राने हे दिलं नाही, ते दिलं नाही. जाणीवपूर्वक ते कांगावा करत आहे. त्यांना माहिती असून देखील ते मुद्दामहून दररोज खोट बोलून रेटून बोला, असा त्यांचा कार्यक्रम ठरला असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

मराठा समाजाची फसवणूक

महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे. अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेव्यतिरिक्त कोणतेही काम केले नाही, अशी टीका त्यांनी केली. राज्यपालांना भेटून एक पत्र देऊन काही होत नाही. एका पानाचे निवेदन दिले आहे. त्यामुळे असा काही फरक पडत नाही. उलट मोदींनी मराठा आरक्षण द्यावे, अशी मागणी करत आहेत. हे चुकीचे असून सरकारकडे कोणताच प्रस्ताव नाही, आपल्या अंगावर आलेले काम झटकण्याचा प्रयत्न आहे, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लगावला.