बाळासाहेब थोरातांचं ‘ते’ पत्र संशयास्पद, महाविकास आघाडीत ‘फूट’ ? काँग्रेस नेत्याचा ‘दावा’

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर याचे पडसाद स्थानिक पातळीवर देखील पहायला मिळत आहेत. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यातले राजकीय वैर आणखीनच वाढले आहे. त्यातच येत्या 29 डिसेंबरला सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे सहाजिकच याही निवडणुकीत केसरकर आणि राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सावंतवाडीतही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत तीन्ही पक्षांकडून एक उमेदवार देणे अपेक्षित होते. तसे शिवसेनेच्या उमेदवारीवर तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे एकमत झाले. मात्र, या नेत्यांच्या बैठकीआधीच काँग्रेसने दिलीप नार्वेकरांना एबी फॉर्म देण्यात आला होता. या फॉर्मबाबत आपल्याला पक्षाकडून काहीही कल्पना न देता तो नार्वेकरांना परस्पर देण्यात आल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी केला आहे.

पक्षाचा एबी फॉर्म जरी दिला असला तरीही पक्षाने उमेदवारी मागे घेण्यास सांगितल्यानंतर नार्वेकरांनी आपली उमेदवारी मागे घेणे आवश्यक होते. मात्र त्यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली. उलट प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी असलेले शुभेच्छापत्र नार्वेकरांनी व्हायरल केले आहे. त्यामुळे सावंतवाडी नागराध्यपदाच्या निवडणुकीत भाजपसोबतच महाविकास आघाडीतही फूट पडली आहे. नार्वेकर यांनी व्हायरल केलेले बाळासाहेब थोरातांचे पत्र संशयास्पद असल्याचा दावा विकास सावंत यांनी केला आहे.
काय आहे त्या पत्राचे गौडबंगाल ?

जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये 15 डिसेंबरला बैठक झाली. या बैठकीत दिपक केसरकर यांचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार नार्वेकर यांनी आपला अर्ज मागे घेणे अपेक्षित होते. मात्र, अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी न घेता बाळासाहेब थोरात यांच्या सहीचे पत्र व्हायरल केले. आपली उमेदवारी निश्चित असल्याचे दाखवण्यासाठी नार्वेकरांनी 18 डिसेंबरला हे पत्र व्हयरल केले.

हे पत्र संशयास्पद
नार्वेकरांना व्हायरल केलेले बाळासाहेब थोरातांच्या सहीचे पत्र संशयास्पद वाटते. कारण राजकीय पत्र महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून वापरण्यात आलेल्या लेटरहेडवर देता येत नाही. दुसरे म्हणजे या पत्रातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या पत्रावर असलेली बाळासाहेब थोरातांची सही. बाळासाहेब थोरात नेहमी इंग्रजीतून सही करतात या पत्रावर मराठीत सही आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, हे पत्र ज्या तारखेला म्हणजे 18 डिसेंबरला नार्वेकरांना देण्यात आले, त्या दिवशी बाळासाहेब थोरात नागपूरला होते आणि हे पत्र त्यांच्या संगमनेर येथील कार्यालयाकडून देण्यात आले असल्याचे विकास सावंत यांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/