‘चौकशीशिवाय कारवाई ठरेल अन्यायकारक’, ‘या’ मंत्र्यांकडून संजय राठोडांची पाठराखण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आल्याने त्यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित काही फोटो, ऑडिओ क्लिप आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले होते. त्यांनतर संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत सरकारकडूनसुद्धा कोणती कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणामुळे विरोधक खूप आक्रमक झाले आहेत. त्यासाठी भाजपकडून राज्यभर आंदोलनसुद्धा करण्यात आले आहे. विरोधकांकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया
संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून संजय राठोड यांची पाठराखण करण्यात आली आहे. कोणतीही चौकशी न करता संजय राठोड यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक ठरेल. विरोधकांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचा मुद्दा चांगलाच उचलून धरला आहे. तसेच जर जर संजय राठोड दोषी असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे असेसुद्धा वडेट्टीवार म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील. मात्र मागच्या ५ वर्षांत भाजपच्या मंत्र्यांवर आरोप झाल्यावर त्याच्या नेत्यांनी किती राजीनामे घेतले असा सवालसुद्धा वडेट्टीवार यांनी भाजपला विचारला आहे. तसेच ते म्हणाले चित्रा वाघ यांच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी केलेली कारवाई सूडबुद्धीची आहे असेसुद्धा म्हणता येणार नाही.

पूजा चव्हाण प्रकरणी भाजप आक्रमक झाल्याची पाहायला मिळत आहे. पूजाला न्याय मिळावा म्हणून अशी मागणी भाजपच्या महिला मोर्चाकडून करण्यात येत आहे. आज राज्यभरात संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार, संजय राठोड यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांकडून मुंबईतील मुलुंड टोलनाका जाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय नवी मुंबई, यवतमाळ, वसई-विरार, औरंगाबाद, चेंबूर या ठिकाणीसुद्धा भाजपकडून आंदोलन करण्यात आले. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी हा मुद्दा मोठ्या प्रमाणात उचलून धरला आहे. त्यांच्याकडून वेळोवेळी या प्रकरणाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच त्यांनी पोलीस प्रशासन गुन्हेगाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपदेखील केला आहे.