भाजपाच्या राज्य अधिवेशनात ‘महाविकास’च्या 80 दिवसांच्या कामकाजाचा होणार ‘पंचनामा’ !

नवी मुंबई :पोलीसनामा ऑनलाईन –  भाजपाचे दोन दिवसांचे राज्यव्यापी अधिवेशन १५ व १६ फेब्रुवारी रोजी नवी मुंबईत होत आहे. या अधिवेशनात दोन ठराव मांडण्यात येणार आहे. त्यात शिवसेनेने कशा प्रकारे जनतेची फसवणुक केली़ तसेच या महाविकास आघाडी सरकारच्या ८० दिवसांच्या कामकाजाचा पंचनामा करण्यात येणार आहे. या राज्यव्यापी अधिवेशनाला १० हजारांहून अधिक भाजपा पदाधिकारी सामील होण्याची शक्यता आहे.

शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहणाने अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर नड्डा उपस्थितींना मार्गदर्शन करणार आहेत. नव्याने पुर्न नियुक्ती झालेले चंद्रकांत पाटील आजच भाजपा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील भाजपाचे खासदार, महापौर, नगरसेवक व सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

या अधिवेशनात दोन प्रस्ताव पास होणार आहेत. यामध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपा -शिवसेनेला राज्यातील जनतेने कौल दिला. मात्र, शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तसेच या सरकारच्या कामाकाजाचा पंचनामा करण्यात येऊन तो लोकांपर्यंत पोहचविला जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात श्रीराम मंदिर ट्रस्टची स्थापना,नागरिकत्व दुरुस्ती कायदा अशा सर्व निर्णयांना समर्थन दिले जाणार आहे.