चंद्रकांत पाटलांसह भाजपाला मोठा धक्का ! पुणे पदवीधर मतदारसंघात ‘महाविकास’चे अरुण लाड विजयी

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी पसंतीच्या मताचा कोटा पूर्ण करुन पहिल्या फेरीतच विजय मिळवत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. अरुण लाड यांनी ४९ हजार ७०० मतांनी विजय मिळविला आहे.

अरुण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली तर भाजपाचे संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते मिळाली. औरंगाबाद पाठोपाठ पुणे पदवीधर मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतामध्येच मतांचा कोटा पूर्ण झाला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची कोथरुडमधून विधानसभेवर निवड झाल्याने त्यांनी या आमदारपदाचा राजीनामा दिला होता. भाजपाने मतदार नोंदणीसाठी पाचही जिल्ह्यात मोठी मोहीम हाती घेतली होती. मतदानही अधिक झाले होते. त्यामुळे ही निवडणुक चुरशीची होईल, असे वाटत होते. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड यांनी संग्राम देशमुख यांच्यावर मोठा विजय मिळवत लढत एकतर्फी केली.

विजयानंतर अरुण लाड हे सकाळी साडेनऊ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मोदीबाग येथे भेट घेणार आहे़त.