राज्यावर वीज कडाडणार ! ; १ एप्रिलपासून ‘एवढ्या’ टक्क्यांनी दरवाढ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे. १ एप्रिलपासून महावितरणकडून विजेच्या दरात सहा टक्क्यांनी वाढ होणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर २०१८ मध्ये दिलेल्या वीजदरवाढ आदेशानुसार, राज्याला वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीजदर पुन्हा वाढणार आहेत.

राज्य वीज आयोगानं गेल्या वर्षी १२ सप्टेंबरला राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीजदरांना मान्यता दिली होती. त्यानुसार महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांचे वीजदर वाढले. महावितरणला ८२६८ कोटी रुपयांची दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यामुळे १ एप्रिल २०१९ पासून नव्या आर्थिक वर्षांतही पुन्हा या दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे.

अशी असेल दरवाढ –

दरमहा १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांकडून महावितरण ५.३० रुपये प्रति युनिट इतका दर आकारतं. आता त्यामध्ये १६ पैशांची भर पडेल. त्यामुळे एका युनिटसाठी ५.४६ रुपये मोजावे लागतील. तर १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति युनिटमागे २४ पैसे जास्त मोजावे लागतील. ५०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांची वीज १५ पैशांनी महाग होणार आहे. वीजदरांसोबतच स्थिर आकारातही १० रुपयांची वाढ होणार आहे. तो ८० रुपयांवरून ९० रुपये होणार आहे.

You might also like