‘महावितरण’चा भोंगळ कारभार ; २८ गावं अंधारात

अकाेला: पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून कारंजा रम. परिसरातील तब्बल २८ गावांचा दिवसातून अनेक वेळा विद्युतपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

कारंजा रम. व निंबा परिसरातील ट्रान्सफार्मर जळाल्यामुळे २८ गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. महावितरणाकडून या गावांना तात्पुरत्या स्वरुपात विद्युत पुरवठा देण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र ९ तास भारनियमना व्यतिरिक्त विद्युत पुरवठा खंडित होऊन दिवसभरात फक्त २ ते ३ तास लाइट असते. हा विद्युत पुरवठा देखील प्रत्येक दहा मिनिटांनी खंडित होतो. त्यामुळे या 28 गावांवर पाण्याचे मोठे संकट ओढवले आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही. ते जेव्हा दुरुस्ती करतील, तेव्हा करतील. त्यांना नागरिकांनी जाब विचारू नये, असे येथील अधिकाऱ्यांचे वर्तन आहे. एकीकडे अस्मानी संकटांनी शेतकरी घेरलेला असताना या सुलतानी संकटामुळे हाताशी आलेले कपाशी, तूर तसेच रब्बी हरभऱ्याचे पिक पाण्याअभावी सुकून जाण्याच्या मार्गावर आहे. या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यात महावितरण अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, नविन ट्रान्सफार्मर बसविणे तसेच मुख्यालयी लाईनमन नियुक्त करण्याबाबत निंबा परिसरातील गणेश देशमुख, नितीन देशमुख, अजय देशमुख, ज्ञानेश्वर मोरखडे, अशोक पाटील, सुरेश वाकडे, सै अमीर, मनोहर सगणे, अनंत देशमुख, विठ्ठलराव कोरडे,रमेश झाडोकार, ज्ञानेश्वर बाजोड, विजय माळी, विठ्ठल कराळे, रवींद्र बदरखे, शैलेंद्र तायडे, नितीन देशमुख, विजय देशमुख, विनायक आंबूस्कर, सुनिल देशमुख, अविनाश देशमुख, खंडू पुंडे, भुषण देशमुख, गणेश जाधव, शंकर देशमुख, सतीश ठाकरे, गणेश नारायणराव देशमुख, ज्ञानेश्वर गणपती मोरखडे, नितीन सुरेशराव देशमुख, अशोक मोतीराम तायडे, से. अमिर से. नत्थु, सुरेश जगन्नाथ वाकडे, मनोहर लक्ष्मण सगने, अनंत केशवराव देशमुख, रमेश पुरुषोत्तम झाडेकर, ज्ञानेश्वर विठ्ठलराव बाजोड या शेतकऱ्यांकडून महावितरण कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे.

जर नविन ट्रान्सफार्मर बसवून विजेचा प्रश्न सोडवला नाही तर आंदोलन करु, असा इशाराही निंबा परिसरातील शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.