वीजबिलांच्या थकबाकीदारांना महावितरणचा शॉक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यात सातत्याने वीजबिलांची थकबाकी ठेवणाऱ्या व वारंवार आवाहन करूनही थकीत रकमेचा भरणा न करणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील 32,252 ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आला आहे. यामध्ये 11386 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करण्यात आला आहे.

दरम्यान थकबाकी व चालू वीजबिलांचा भरणा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील महावितरणचे सर्व अधिकृत स्थानिक वीजबिल भरणा केंद्र दि. 23 व 24 फेब्रुवारीला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. याशिवाय घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची अधिकृत वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

गेल्या पंधरवड्यापासून पुणे जिल्ह्यात महावितरणकडून थकबाकीदारांविरुद्ध मोहिमेद्वारे कठोर कारवाईला सुरवात झाली आहे. या मोहिमेत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा अधिकारी व हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत. वीजग्राहकांकडे महावितरणच्या मासिक वीजबिलांचा एक रुपयाही थकीत राहणार नाही या ध्येयाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत संबंधीत थकबाकीदाराचा वीजपुरवठा खंडितच करण्याचे निर्देश सर्व अधिकारी व जनमित्रांना देण्यात आलेले आहेत. गेल्या काही महिन्यांतील वाढत्या थकबाकीची गंभीर दखल घेऊन थकबाकी वसुलीमध्ये सातत्य ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयनिहाय थकबाकी व होणारी वसुली याचे दैनंदिन पर्यवेक्षण वरिष्ठ पातळीवरून सुरु करण्यात आले आहे.

घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीमध्ये थकबाकीदार असणाऱ्या पुणे शहरातील 14355 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामध्ये 4694 जणांचा कायमस्वरुपी तर 9650 जणांचा तात्पुरता वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पिंपरी व चिंचवड शहरात 1333 कायमस्वरुपी तर 6505 तात्पुरता अशा एकूण 7838 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर पुणे जिल्ह्याच्या मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे, शिरूर, दौंड, भोर, बारामती, पुरंदर व इंदापूर तालुक्यांत देखील 5359 कायमस्वरुपी तर 4711 तात्पुरत्या अशा एकूण 10070 थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर थकबाकीदाराने अनधिकृतपणे वीजवापर केल्यास थेट फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

वीजबिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे. चालू व थकीत वीजबिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी अधिकृत वीजबील भरणा केंद्रांसह www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.