क्रिकेटच्या चाहत्यांसाठी खुशखबर ! 2021 पर्यंत फक्त धोनी…धोनी

चेन्नई : वृत्तसंस्था – लाखो क्रिकेट प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी गेल्या तीन महिन्यांपासून क्रिकेट पासून दूर आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप २०१९ मध्ये न्यूझीलंड विरोधात धोनीने अखेरचा सामना खेळला. त्यामुळं धोनी पुन्हा कधी कमबॅक करणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून होते. अखेर धोनीच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आणि धोनीने आता आपल्या चाहत्यांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे.

वर्ल्ड कप २०१९ नंतर गेल्या तीन-चार महिन्यात क्रिकेटपासून दूर असलेला महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळत राहणार आहे आणि आपल्या चातुर्याच्या आणि खेळीच्या जोरावर संघाला जास्तीत जास्त मजबुती प्रदान करणार आहे. २०२० मध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये धोनी खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती, परंतु होनी खेळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाल्याने ही चेन्नईच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

धोनी आयपीएलच्या तेराव्या हंगामानंतर निवृत्तीबाबत विचार करणार आहे. तसेच, २०२१ पर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच असणार आहे. याआधी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीचे आंतरराष्ट्रीय करिअर संपलेले नाही, असे सुचक वक्तव्य करत धोनी संघात राहणार याबाबतचे संकेत देखील दिले होते. त्यामुळं धोनी आयपीएलमध्ये पुनरागमन करून त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत निर्णय घेणार आहे.

धोनी खेळणार २०२१ पर्यंत आयपीएल
आयपीएल चा विषय निघाला की समोर उभी राहते ती टीम म्हणजे चेन्नई सुपरकिंग्ज. कारण चेन्नईने आजपर्यंत बाकी संघांच्या नाके नऊ थरारक खेळी करत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तब्बल तीन वेळा धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्ज ने विजय मिळवला आहे. त्यामुळे संघाला चॅम्पियन करणारा धोनी २०२१ पर्यंत आयपीएल खेळत राहणार असल्याने चेन्नईच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धोनीकडे २०२१ पर्यंत चेन्नई सुपरकिंग्ज चे कर्णधारपद असणार याबाबत सूत्रांकडून समजले.

टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या माहितीनुसार चेन्नई संघाच्या मालकांनी धोनी २०२१ पर्यंत खेळत राहणार असल्याचे सांगितले. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “आयपीएल २०२१ मध्ये मोठा लिलाव होणार आहे. त्यामुळं धोनी २०२१ पर्यंत आयपीएलमधून निवृत्ती घेणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळं धोनी आणखी २ वर्ष टी-२० क्रिकेट खेळणार आहे”, असे सांगितले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून धोनीला तब्बल १५ कोटी रुपये मिळतात.

धोनी मार्च मध्ये बांगलादेशकडून खेळणार क्रिकेट
दरम्यान, महेंद्रसिंग धोनी आता येत्या मार्च महिन्यात क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकणार आहे. मात्र धोनी टीम इंडियाकडून नाही तर बांगलादेशमधून क्रिकेट खेळणार आहे. इंडिया टूडेनं दिलेल्या बातमीनुसार, बांगलादेश क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयकडे सात खेळाडूंची मागणी केली आहे. हे खेळाडू आशियाई इलेव्हन संघाकडून रेस्ट ऑफ वर्ल्ड संघाविरोधात दोन टी-२० सामने खेळतील.

हे दोन्ही सामने पुढच्या वर्षी १८ आणि २१ मार्चला खेळले जाणार आहेत. या बातमीनुसार टीम इंडियापासून तीन महिने लांब असलेल्या धोनीचाही समावेश करण्यात आल्याची बातमी पुढे आली आहे. त्यामुळे बीसीसीआयनं परवानगी दिल्यावर धोनी बांगलादेशमधून क्रिकेटमध्ये कमबॅक करून आपल्या खेळीने प्रभावित करू शकतो. बांगलादेशच्या वतीनं बीसीसीआयकडे तगड्या खेळाडूंची मागणी करण्यात आली असून महेंद्रसिंग धोनीबरोबरच, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांचा यात समावेश आहे.

Visit : Policenama.com