‘तू माहेरी गेलीस तर खाली उडी मारेन’, पतीचा शोलेस्टाईल ‘ड्रामा’

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाईन – पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर पतीने उच्च विद्युतप्रवाह असलेल्या टॉवरवर चढून शोलेस्टाइल ड्रामा सुरू केला. तू माहेरी गेली तर खाली उडी मारेन अशी धमकी पत्नीला दिली. सुमारे तासभर चाललेल्या थरारनाट्यानंतर पोलिसांनी पतीची समजूत काढून त्याला खाली उतरवले. मध्य प्रदेशच्या बडवानी येथे ही घटना घडली असून पतीने दिलेल्या या अजब धमकीमुळे परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

पत्नीशी भांडण झाल्यानंतर हा पती उच्चविद्युत प्रवाह असलेल्या टॉवरवर चढला. मात्र सुदैवाने त्यावेळी वीजप्रवाह सुरू नव्हता. मात्र हा ड्रामा पाहण्यासाठी बघ्यांनी त्याठिकाणी एकच गर्दी केली होती. टॉवरवर सुमारे 80 फूट उंचावर चढलेला पती माहेरी गेलीस तर खाली उडी मारेन, असे पत्नीला सातत्याने सांगत होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरही सुमारे तासभर हा ड्रामा सुरू होता. अखेरीस पोलिसांनी या पतीची समजूत काढून त्याला खाली उतरवण्यात यश मिळवले. दरम्यान, पतीच्या या ड्राम्याची माहिती पत्नीला मिळाल्यानंतर तीसुद्धा घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर या पराक्रमी पतीला खाली उतरवण्याची मोहीम सुरू झाली. अखेरीस बराचवेळ समजावल्यानंतर तो खाली उतरला.