सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – Mahesh Kothe Died In Kumbhmela | सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. कुंभमेळाच्या निमित्ताने प्रयागराज येथे गेल्यानंतर थंडीमध्ये रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती आहे. महेश कोठे हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सोलापुरातील दिग्गज नेते आहेत. नुकतीच त्यांनी विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, ” महेश कोठे हे आपल्या काही मित्रांसोबत प्रयागराज येथे कुंभमेळाव्यात सहभागी होण्यासाठी गेले होते. नदीमध्ये स्नान करून बाहेर आल्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. महेश कोठे हे विष्णुपंत कोठे यांचे चिरंजीव होते. विष्णुपंत कोठे आणि महेश कोठे हे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जात होते. सोलापूरमधील काँग्रेस मजबूत करण्यासाठी आणि सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आणण्याकरिता कोठे परिवाराची भूमिका अत्यंत महत्वाची होती.
पुढे महेश कोठेंनी काँग्रेस पक्षातून शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा प्रवास केला होता. सोलापूर महापालिकेमध्ये त्यांनी महापौरपद भूषविले. महापालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते. महानगरपालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्याचे अचानक निधन झाल्याने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.